संत गाडगेबाबा महाराज
गाडगे बाबा (जन्म :- शेंडगाव, २३ फेब्रुवारी १८७६; - अमरावती, २० डिसेंबर १९५६) हे गाडगे बाबा म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्र राज्यातील एक कीर्तनकार, संत आणि समाजसुधारक होते. त्यांनी स्वेच्छेने गरीब रहाणी स्वीकारली होती. ते सामाजिक न्याय देण्यासाठी विविध गावांना भटकत असत. गाडगे महाराजांची सामाजिक न्याय, सुधारणा आणि स्वच्छता या विषयांत जास्त रुची होती. विसाव्या शतकातील समाजसुधार आंदोलनांमध्ये ज्या महापुरुषांचा सहभाग आहे, त्यापैकी एक महत्त्वाचे नाव गाडगे बाबा यांचे आहे.[ संदर्भ हवा ]
संत गाडगे महाराजांचे पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर होते. त्यांच्या वडिलांचे नाव - झिंगराजी राणोजी जाणोरकर, तर आईचे नाव - सखुबाई झिंगराजी जणोरकर हे होते. गाडगे महाराज हे वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले समाजसुधारक होते. दीनदलित आणि पीडितांच्या सेवेमध्ये आपले संपूर्ण आयुष्य व्यतीत करणारे होते. त्यांच कीर्तन म्हणजे लोक प्रबोधनाचा एक भाग असे. आपल्या कीर्तनातून समाजातील दांभिकपणा रूढी परंपरा यावर ते टीका करत. समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून देताना स्वच्छता आणि चारित्र्य याची शिकवण गाडगेबाबा देत.
गाडगे महाराज हे गोरगरीब, दीनदलित यांच्यामधील अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी कार्य करणारे समाजसुधारक होते. तीर्थी धोंडापाणी देव रोकडा सज्जनी |" असे सांगत दीन, दुबळे, अनाथ, अपंगांची सेवा करणारे थोर संत म्हणजे गाडगेबाबा. "देवळात जाऊ नका, मूर्तिपूजा करू नका, सावकाराचे कर्ज काढू नका, अडाणी राहू नका, पोथी-पुराणे, मंत्र-तंत्र, देवदेवस्की, चमत्कार असल्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका." अशी शिकवण आयुष्यभर त्यांनी लोकांना दिली. माणसात देव शोधणाऱ्या या संताने लोकांनी दिलेल्या देणग्यांतील पैशांतून रंजल्या-गांजल्या, अनाथ लोकांसाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी धर्मशाळा, अनाथालये, आश्रम, व विद्यालये सुरू केली. रंजले-गांजले, दीन-दुबळे, अपंग-अनाथ हेच त्यांचे देव. या देवांतच गाडगेबाबा अधिक रमत असत. डोक्यावर झिंज्या, त्यावर खापराच्या तुकड्याची टोपी, एका कानात कवडी, तर दुसऱ्या कानात फुटक्या बांगडीची काच, एका हातात झाडू, दुसऱ्या हातात मडके असा त्यांचा वेश असे.
"संत गाडगेबाबांचा दशसूत्री संदेश "
गाडगेबाबा प्रबोधन काव्य
भुकेलेल्यांना = अन्न
तहानलेल्यांना = पाणी
उघड्यानागड्यांना = वस्त्र
गरीब मुलामुलींना = शिक्षणासाठी मदत
बेघरांना = आसरा
अंध, पंगू रोगी यांना = औषधोपचार
बेकारांना = रोजगार
पशु-पक्षी, मुक्या प्राण्यांना = अभय
गरीब तरुण-तरुणींचे = लग्न
दुःखी व निराशांना = हिंमत
गोरगरिबांना = शिक्षण
हाच आजचा रोकडा धर्म आहे ! हीच खरी भक्ती व देवपूजा आहे !! . संक्षिप्त चरित्र :-
- गाडगे महाराजांनी कीर्तनाद्वारे आपले लोकशिक्षणाचे कार्य ऋणमोचन (विदर्भ) या गावापासून सुरू केले.
ऋणमोचन येथे त्यांनी 'लक्ष्मीनारायणाचे' मंदिर बांधले.
- १९०८ मध्ये पूर्णा नदीवर घाट बांधून घेतला.
- १९२५- मूर्तिजापूर येथे गोरक्षणाचे काम केले आणि एक धर्मशाळा व एक विद्यालय बांधले.
१९१७- पंढरपूर येथे चोखामेळा धर्मशाला बांधली.
"मी कुणाचा गुरू नाही व माझा कुणी शिष्य नाही" असे म्हणून त्यांनी कुठल्याही संप्रदायाला समर्थन देण्याचे नाकारले.
फेब्रुवारी ८, इ.स. १९५२ रोजी 'श्री गाडगेबाबा मिशन' स्थापन करून महाराष्ट्रभर शिक्षणसंथा व धर्मशाळा स्थापन केल्या.
गाडगे महाराज गोधडे महाराज म्हणूनही ओळखले जात होते.
१९३२ - ऋणमोचन येथील सदावर्त संत गाडगेबाबांनी सुरू केले.. . गाडगे महाराजांनी कीर्तनांद्वारे लोकजागृतीचा मार्ग अवलंबला.
"गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला" हे गाडगे महाराजांचे आवडते भजन होते.त्यांचे जीवनावर देवकीनंदन गोपाला हा चित्रपटही निघाला आहे. यातील "गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला" हे गीत मन्ना डे यांनी गायले.
आचार्य अत्रे गाडगेबाबांबद्दल म्हणतात 'सिंहाला पाहावे वनात, हत्तीला पाहावे रानात, तर गाडगेबाबांना पाहावे कीर्तनात."
- १८९२ डेबुजीचे लग्न. कमलापूर तरोडा तालुका दर्यापूर जिल्हा अमरावती येथील धनाजी खंडाळकर यांची कन्या गुंताबाई यांच्याशी डेबुचा विवाह पार पडला.
- १ फेब्रुवारी १९०५ रोजी सकाळी ३.०० वाजता गृहत्याग.
- १९२१ मराठा धर्मशाळा पंढरपूर येथे सदावर्त उघडले.
- १ मे १९२३ - आई सखुबाई यांचे निधन.
- ५ मे १९२३ - एकुलता एक पुत्र गोविंदाचे निधन.
- १९२६ - संत गाडगेबाबांची व कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याशी एका कार्यक्रमात भेट.
- १९३२ नाशिक येथे सदावर्त उघडले.
- १९३१ वरवंडे येथे गाडगेबाबांच्या प्रबोधनातून पशुहत्या बंद झाली.
- २७ नोव्हेंबर १९३५ - वर्धा येथे महात्मा गांधी व गाडगेबाबांची पहिली भेट.
- १४ जुलै १९४९ - रोजी स्वतः पंढरपूर येथे स्थापन केलेल्या 'संत चोखामेळा धर्मशाळे'ची सर्व कागदपत्रे स्वतःचा अंगठा उमटवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सुपूर्द केले.
- १९५२ - पंढरपूर येथे भरलेल्या कीर्तन परिषदेतील अस्पृश्यता निर्मूलन यासंदर्भात कठोर भूमिका मांडून दलितांची सेवा करण्यासाठी कीर्तनकारांनी पुढाकार घ्यावा, असे कळकळीचे आवाहन या किर्तन परिषदेतून त्यांनी केले होते.
- १९५४ - कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची अंतर्गत कराड येथे सद्गुरू गाडगे महाराज विद्यालयाची स्थापना केली.
- १९५४- गाडगेबाबांनी मुंबईत जे.जे. हॉस्पिटलच्या रोग्यांच्या नातेवाइकांना उतरण्यासाठी हॉस्पिटलजवळ धर्मशाळा बांधली.
- गाडगेबाबांनी डॉ. पंजाबराव देशमुख, व कर्मवीर भाऊराव पाटील यांना त्यांच्या कार्यात मदत केली होती.
- डॉ आंबेडकर त्यांना गुरुस्थानी मानत असत.
- ८ नोव्हेंबर १९५६ रोजी संत गाडगे महाराजांचे वांद्रे पोलीस स्टेशन मुंबई येथे झालेले कीर्तन करण्यात आले आहे. त्यांच्या हयातीतील त्यांच्या आवाजात असलेले मूळ ध्वनी मुद्रित करण्यात आलेले एकमेव किर्तन असल्यामुळे याद्वारे आपणाला त्यांचे स्पष्ट व परखड विचार ऐकण्यास मिळतात व गाडगेबाबा समजण्यास व त्यांचा अभ्यास करण्यास आपणाला फार मोठी मदत होते.( ते कीर्तन आपण You tube इथे ऐकू शकता.)
- १४ नोव्हेंबर १९५६ रोजी संत गाडगे बाबांचे पंढरपूर येथे झालेले किर्तन हेच त्यांचे अखेरचे किर्तन ठरले.
- २० डिसेंबर १९५६ रोजी पेढी नदीच्या काठावर वलगाव (अमरावती) येथे मृत्यू. गाडगेनगर, अमरावती येथे स्मारक आहे.
गाडगे महाराजांची चरित्रे[संपादन]
- असे होते गाडगेबाबा (प्राचार्य रा.तु. भगत)
- ओळख गाडगेबाबांची (प्राचार्य रा.तु. भगत)
- कर्मयोगी गाडगेबाबा (मनोज तायडे)
- गाडगेबाबा (चरित्र, प्रबोधनकार ठाकरे)
- गाडगे बाबांचा पदस्पर्श (केशव बा. वसेकर)
- श्री गाडगेबाबांचे शेवटचें कीर्तन (गो.नी. दांडेकर)
- Shri Gadge Maharaj (इंग्रजी, गो.नी. दांडेकर)
- प्रबोधन पंढरीचा क्रांतिकारी संत-गाडगेबाबा (संतोष अरसोड)
- गाडगेबाबांच्या सहवासात (जुगलकिशोर राठी)
- गाडगे माहात्म्य (काव्यात्मक चरित्र, नारायण वासुदेव गोखले)
- गोष्टीरूप गाडगेबाबा (विजया ब्राम्हणकर)
- निवडक गाडगेबाबा (प्राचार्य रा.तु. भगत)
- मुलांचे गाडगेबाबा (प्राचार्य रा.तु. भगत)
- लोकशिक्षक गाडगेबाबा (रामचंद्र देखणे)
- लोकशिक्षणाचे शिल्पकार (रा.तु. भगत)
- लोकोत्तर : गाडगेबाबा जीवन आणि कार्य (डॉ. द.ता. भोसले)
- The Wandering Saint (इंग्रजी, वसंत शिरवाडकर)
- संत गाडगेबाबा (गिरिजा कीर)
- संत गाडगेबाबा (दिलीप सुरवाडे)
- संत गाडगेबाबा (प्राचार्य रा.तु. भगत)
- Sant Gadagebaba (इंग्रजी, प्राचार्य रा.तु. भगत)
- संत गाडगेबाबांची भ्रमणगाथा (प्राचार्य रा.तु. भगत)
- श्रीसंत गाडगे महाराज (मधुकर केचे)
- श्री संत गाडगे महाराज ऊर्फ गोधडे महाराज यांचे चरित्र (पां.बा. कवडे, पंढरपूर)
- संत श्री गाडगे महाराज (डॉ. शरदचंद्र कोपर्डेकर)
- गाडगे महाराजांच्या गोष्टी (सुबोध मुजुमदार)
- समतासूर्य गाडगेबाबा (प्राचार्य रा.तु. भगत )
- स्वच्छतासंत गाडगेबाबा (प्राचार्य रा.तु. भगत)
गाडगेबाबांच्या जीवनावरील चित्रपट[संपादन]
- डेबू : हा चित्रपट गाडगे महाराजांच्या जीवनावर आहे. दिग्दर्शक - नीलेश जलमकर
- देवकीनंदन गोपाळा : हाही चित्रपट गाडगे महाराजांच्या जीवनावर आहे. दिग्दर्शक - राजदत्त